कृषि उत्पन्न बाजार समिती, सावनेर

दामोदर नाईक मार्केट यार्ड, सावनेर

विदर्भातील अग्रगन्य बाजार समिती

सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ची स्थापना दिनांक ०४/०१/१९७३ ला कै. दामोदरराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांनी सहकार महर्षी आदरणीय कै. बाबासाहेब केदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याला सुरुवात केली. मार्केट यार्ड करिता जमीन संपादनाची कार्यवाही जिल्हा अधिकारी नागपूर यांचे कडे करीत असतांना कै. दामोदरराव नाईक यांनी अनेक व्यत्तय पार करून पराकाष्ठेने दि. ०९/०३/१९७७ ला २.०८ हे.आर जमिनीचा ताबा मिळाला . त्याचा पावती म्हणजे सावनेर मार्केट यार्ड ला “कै. दामोदरराव नाईक मार्केट यार्ड” असे नाव दि. ०५/०४/१९८० रोजी मा.माजी मंत्री नरेंद्रजी तिडके यांचे अध्यक्षतेखाली सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे शुभ हस्ते नामकरण समारंभात देण्यात आले.

कै. दामोदरराव नाईकांच्या मृत्यु नंतर कै. गुणवंतराव केदार यांनी दि. १७/०८/१९८२ पासून दि. १०/०२/२००४ पर्यंत बाजार समिती चे सभापती पद भूषविले. त्यांचे कार्यकाळात बांधकामासाठी शासनाकडून, कृषी व पणन मंडळ पुणे आणि सहकारी बँक यांचे कडून घेतलेल्या कर्जाची मुदत दि. 26/०८/२००९ पर्यंत कर्ज परतफेड केली. त्यानंतर कै. श्री. सुधाकर वामनरावजी देशमुख (सभापती) व श्री. रवींद्र मनोहरजी चिखले (उपसभापती) पद भूषविले. त्यांचे ही कार्यकाळात समिती ने कर्ज न घेता स्वनिधीतून मुख्य बाजार आवार व उपबाजार येथे आवश्यक विकसनशील बांधकामे केलेत. तसेच नवीन संचालक मंडळाला कार्यभार सोपविताना समितीची स्वनिधी २ कोटी 5 लाख रुपये मुदत ठेव मध्ये गुंतवणूक केलेली आहे.

त्यानंतर संचालक मंडळाची निवडणूक दि. 26/०७/२००९ रोजी झाली. त्या निवडणुकी मध्ये निवडून आलेल्या संचालकांनी दि. २७/०८/२००९ च्या प्रथम सभेमध्ये कै. विठोबा केशवराव पावडे यांची सभापती व श्री. रवींद्र मनोहर चिखले यांची उपसभापती म्हणून आविरोध निवड केली. या संचालक मंडळाने सहकार महर्षी आदरणीय कै. बाबासाहेब केदार आणि मा.श्री. सुनिलबाबू केदार (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांचे मार्गदर्शनाखाली कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता आहवालाचे २ वर्षात १ कोटी रुपयाची आवश्यकतेनुसार विकसनशील बांधकामे सावनेर मार्केट यार्ड वर केली.

त्यानंतर संचालक मंडळाची निवडणूक दि. ०३/०५/२०१५ रोजी झाली. त्या निवडणुकी मध्ये निवडून आलेल्या संचालकांची दि. २९/०५/२०१५ च्या प्रथम सभेत श्री. गुणवंत त्र्यंबकरावजी चौधरी यांची सभापती आणि श्री. चंद्रशेखर रामभाऊजी कुंभलकर यांची उपसभापती म्हणून आविरोध निवड केली. या संचालक मंडळाने मा.श्री. सुनिलबाबू केदार (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता आवश्यकतेनुसार विकसनशील बांधकाम सावनेर मार्केट यार्ड वर केली आहे. त्यांचा कार्यकाळ दि. २२/०४/२०२२ पर्यंत होता.

त्यानंतर दि. २३/०४/२०२२ रोजी बाजार समितीवर शासकीय प्रशासकाची नियुक्ती झाली. शासकीय प्रशासक म्हणून श्री. राजेंद्र लक्ष्मणराव वाघे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सावनेर) यांनी दि. १२/०५/२०२३ पर्यंत समिती चे कामकाज पहिले.

विद्यमान संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या संचालकांनी दि. १२/०५/२०२३ च्या प्रथम सभेत श्री. रवींद्र मनोहरजी चिखले यांची सभापती आणि श्री. प्रकाश शामरावजी लांजेवार यांची उपसभापती म्हणून अविरोध निवड केली.

दि. ३१/०३/२०२५ पर्यंत ३७ कोटी ५० लाख रुपये बाजार समितीचा स्वनिधी सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव गुंतवणूक केलेली आहे.

बाजार समिती चे कार्यक्षेत्र

सावनेर कृषी उत्पन्न बाजार समिती चे कार्यक्षेत्रामध्ये सावनेर पंचायत समिती अंतर्गत येणारी गावे तसेच सावनेर व खापा नगर परिषद असे एकूण १३५ गावापुरते मर्यादित आहे.

नियंत्रित शेतमाल

मा. पणन संचालक, महा.राज्य पुणे आणि मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांनी वेळोवेळी शासकीय अधिसूचनेद्वारे कापूस (सरकी काढलेला व सरकी न काढलेला) भुईमुंग (फोडलेला व न फोडलेला), सोयाबीन, जवस, तीळ,एरंडी, अंबाडी, गहू, धान, तांदूळ, ज्वारी, चना, तुवर, उडीद, मुंग, वटाणे, संत्रा, बटाटे, कांदे, टमाटर, पालेभाज्या व भाज्या, रताळी इत्यादी शेतमालाचे तसेच गुरेढोरे, शेळ्या मेंढ्या चे नियमन केले जाते.

शेतमाल नियमन कार्य

सावनेर मुख्य बाजार आवार

या बाजार आवाराची जागा ६.१२ हे.आर असून या जागेची सीमा क्षेत्र कलम 5 (२) अन्वये मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांनी अधिसूचना क्रमांक विकास-४ कृषि उत्पन्न बाजार समिती सावनेर – १४२५-१९८३ अन्वये दि. ०१ ऑक्टोबर १९८३ ला जाहीर केले आहे. सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात दि. २२ मार्च १९८४ ला प्रसिद्ध झाली आहे. या आवारात कापूस बाजार व धान्य बाजार सुरु आहे.

खापा उपबाजार आवर

या बाजार आवाराची जागा १.२१ हे.आर असून या जागेची सीमा क्षेत्र कलम 5 (२) अन्वये मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांनी अधिसूचना क्रमांक विकास/४/उपबाजार/सावनेर/एपीएम/राजपत्र ७२२६/८४ अन्वये दि. ३० एप्रिल १९८४ ला जाहीर केले आहे. सदर अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात दि. २८ जून १९८४ ला प्रसिद्ध झाली आहे. या आवारात दर रविवारी बैल बाजार भरतो व इतर दिवशी धान्य बाजार सुरु आहे.

बाजार आवारातील उपलब्ध सोई

सावनेर मुख्य बाजार

मुख्य बाजार आवार सावनेर येथे धान्य व तेलबियाणे विक्रीसाठी ३ लिलाव ओटे, अडते व्यापारी दुकाने १९, शेतमाल साठवणुकीसाठी व्यापारी गोडाऊन 8, याशिवाय ७५० मे.टन क्षमतेचे १, १००० मे.टन क्षमतेचे २, शेतमाल तारण गोडाऊन, गुरांचे पाणी पिण्याचे हौद ३, विहीर, पाण्याची टाकी, संडास मुत्रीघारे ४, संत्रा लिलाव ओटे २, कार्यालय इमारत, शेतकरी निवास, कॅन्टीन, चेकपोस्ट, हमाल निवास, कापूस विक्रीसाठी पुरेशी जागा, मार्केट यार्ड मध्ये रोषणाई साठी स्ट्रीट लाईट, लिलाव ओटे व गोडाऊन च्या बाजूला सोडीयम वेपर लाईट, 15 kv जनरेटर आदी सोई उपलब्ध आहे . तसेच शेतकऱ्याच्या शेतमालाचे वजन माप इलेक्ट्रोनिक काट्यावर करण्यात येते. कापसाचे अचूक मोजमाप होण्याकरिता बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग व प्रक्रिया संस्था सावनेर येथे १० मे.टन क्षमतेचा वे-ब्रिज आहे.

खापा उपबाजार आवार

धान्य लिलावासाठी शेड सहित लिलाव ओटा, अडते व्यापारी दुकाने ६, गोडाऊन १, कार्यालय, चेकपोस्ट, संडास, मुत्रीघरे, गुरांना पाणी पिण्यासाठी टाके २, विहीर, पाण्याची टाकी, कॅन्टीन ४, बैलबाजारात गुरांना बांधण्यासाठी लोखंडी खूट्याची, दावण, रोषणाई साठी स्ट्रीट लाईट आदि सोई उपलब्ध आहे. तसेच शेतकऱ्याच्या शेतमालाचे वजन माप इलेक्ट्रोनिक काट्यावर करण्यात येते.

चालू योजना

  • बाजार समितीत शेतमाल विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यासाठी १० रुपयामध्ये जेवणाची योजना चालू आहे.
  • कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याच्या जनावराचा अपघाती मृत्यू झाल्यास १ जनावर रु. १०,०००/-, व २ जनावर मृत्यू पावल्यास रु. 15,०००/- अर्थ सहाय्य देण्यात येते.
  • शेतकऱ्यांना तत्काळ अर्थ विषयक गरजा भागविण्यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना सुरु आहे.
  • दरवर्षी आमसभेत शेतमाल विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांचा लक्की ड्रो काढून शेतीउपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या जाते .